मी ठेवताच संयम सारे जुळून आले
जे पाहिजे मला ते सारे घडून आले
ऐकुन प्रश्न माझा शुन्यात ती हरवली
डोळ्यांमधून उत्तर मग ओघळून आले
निष्कर्ष काढण्याची घाई नको करू तू
ते अर्धसत्य होते जे आढळून आले
अस्तित्व सावलीचे त्याच्याविना अधूरे
आधार द्यावयाला परतून ऊन आले
समजू नकोस सोपी प्रेमातली लढाई
मेले कितीक योद्धे, काही पळून आले
भक्तांसवे नको तू घालूस वाद मित्रा
अपुली गहाण बुद्धी ते पाजळून आले
#अमोलशिरसाट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा